पुण्यातील नाराज मुस्लिमांनी ‘त्या’ उद्घाटन शिलेवरुन खोडले राज ठाकरेंचे नाव


पुणे – गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका मांडली. त्यांनी यावेळेस मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केले. पण मनसेमध्येच राज यांच्या या वक्तव्यावरुन दुमत असल्याचे चित्र दिसत आहे.

पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या या भूमिकेनंतर राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही आपण वॉर्डमध्ये शांतता राखण्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाच आता पुण्यातील कोंढावा येथे राज यांनी उद्धाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

२०१३ साली मनसे अध्यक्षांच्या हस्ते कोंढवा येथील नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण झाले होते. पण राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे. आपल्या भाषणामध्ये राज यांनी मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समाजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नावाला काळे फासले आहे.