भाजप स्थापन दिवस- खास टोप्या, शोभा यात्रेने होतोय साजरा

केंद्रात आणि देशातील अनेक राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आज देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असून संसदेत सर्व खासदारांना खास टोप्या घालून येण्याचे आदेश जारी केले गेले आहेत. भगव्या रंगाच्या या टोपीवर दोन्ही बाजूला भाजप अशी अक्षरे आणि कमळ आहे. ११ मार्च रोजी गुजराथ दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी टोपी घातली होती. या टोपीचे डिझाईन गुजराथ भाजप अध्यक्ष सी आर पाटील यांनी केले असून मोदींनी घातल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून या टोपीसाठी प्रचंड मागणी असल्याचे संगितले जात आहे.

स्थापना दिवस संदर्भात दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नद्डा यांनी घेतलेल्या एका बैठकीत त्यांनी भाजपच्या सर्व खासदारांनी ही टोपी घालून संसदेत जावे असे आदेश दिल्याचे समजते. दरम्यान सकाळी १० वा. पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. यात सर्व खासदार, पार्टी अध्यक्ष, आणि वरिष्ठ मंत्री सामील होणार आहेत. त्यावेळीही सर्वांच्या डोक्यावर या टोप्या असतील.

देशभरातील सर्व भाजप कार्यालयात आज ध्वजवंदन केले जात आहे. शिवाय सर्व ठिकाणी काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रांचे आकर्षण आहेच. भाजपच्या ४२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच शोभा यात्रा काढल्या जाणार आहेत. यात कार्यकर्ते हातात कमळ निशाण घेऊन रस्त्या रस्त्यातून भाजपचा प्रचार करणार आहेत. १२ एप्रिल रोजी देशभर टीकाकरण दिवस, १३ एप्रिल रोजी गरीब कल्याण अन्न योजना राबविली जाणार आहे.

आज दुपारी चार वाजता होत असलेल्या विशेष कार्यक्रमासाठी अनेक देशातील राजदूतांना आमंत्रित केले गेले आहे तसेच नेपाळ पंतप्रधान देऊबा यानाही आमंत्रित केले गेल्याचे समजते.