ट्विटरच्या संचालक मंडळावर मस्क यांची वर्णी

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर मध्ये टेस्ला संस्थापक एलोन मस्क यांनी मोठा हिस्सा खरेदी केल्याचा खुलासा झाल्यानंतर त्यांना ट्वीटरच्या संचालक मंडळात सामील करून घेतले गेले आहे. ट्वीटर कडूनच या बाबतीतील खुलासा केला गेला आहे. अमेरिकेत विनियामक फायलिंग नंतर सोमवारी ट्वीटरचा शेअर २८ टक्क्यांनी वाढला होता. मस्क यांनी ट्वीटर मध्ये ९.२ टक्के हिस्सा घेतला आहे. या संदर्भात सोमवारी घोषणा झाल्यावर ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी मस्क यांना संचालक मंडळावर घेतल्याची घोषणा केली. मस्क २०२४च्या शेअरधारकांच्या सर्वसाधारण वार्षिक सभेपर्यंत या स्थानी राहणार आहेत.

ट्वीटर सीईओ पराग अग्रवाल यांनी मस्क यांचे संचालक मंडळात स्वागत केले आहे. ते म्हणाले गेले काही आठवडे मस्क यांच्यासोबत चर्चा सुरु होत्या आणि त्यातून आमचे संचालक मंडळ मस्क यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. मस्क यांनी उत्तर देताना आगामी काळात पराग यांच्या संचालक मंडळाबरोबर काम करताना ट्वीटर मध्ये काही महत्वाचे बदल घडवून आणण्यास प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. मस्क यांचे ट्वीटर वर ८ कोटी फोलोअर्स आहेत.