राज ठाकरे झाले आजोबा!


मुंबई – आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे सध्या चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. यासंदर्भातील माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन दिली आहे. ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये मिताली या दाखल होत्या. नातू झाल्याची बातमी समजल्यानंतर राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत.

आपल्या फेसबुकवर सचिन मोरे यांनी आमचे साहेब आजोबा झाले, अशी पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी, युवराजांचे आगमन, असे लिहित राज ठाकरेंना नातू झाल्याचेही म्हटले आहे. सचिन यांनी अमित ठाकरेंचेही अभिनंदन केले आहे.

राज यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची बातमी काही आठवड्यांपूर्वीच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचली होती. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या नवीन निवासस्थानी या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी काही आठवड्यांपासून सुरु होती. या बातमीमुळे राज आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच बाळाच्या आजी शर्मिला ठाकरे हे फार आनंदात होते. मिताली यांची प्रसुती एप्रिल महिन्यात होईल, असेही या बातम्यामध्ये सांगण्यात आले होते. मनसे पदाधिकाऱ्याने दुपारी दोनच्या सुमारास केलेल्या पोस्टमध्ये अमित आणि मिताली यांना पुत्ररत्न प्राप्ती झाल्याचे म्हटले.