सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, समन्सला स्थगिती


नेहमीच काही ना काही कारणांमुळे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान चर्चेत असतो. सलमान खानला नुकताच एका न्यायलयीन प्रकरणातून दिलासा मिळाला आहे. अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे सलमानला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पत्रकाराला जवळपास ३ वर्षांपूर्वी धमकावल्याप्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावत त्याला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. सलमानसह त्याच्या अंगरक्षक नवाज शेखला देखील हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले होते. आज (५ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सलमानला दिलासा दिला आहे.

अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी संबंधित पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी बजावलेल्या समन्सला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच सलमानला न्यायालयात हजर राहण्याबाबतही मुभा देण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण ३ वर्षांपूर्वीचे म्हणजे २४ एप्रिल २०१९ चे आहे. पत्रकार अशोक पांडे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.