राज ठाकरेंच्या भोंग्या संदर्भातील वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा


पुणे – गुढीपाडव्याला मुंबईत घेतलेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. राज ठाकरेंनी यावेळी जाहीरपणे हिंदुत्वाची आक्रमक भूमिका मांडताना मशिदीवरील भोंगे न काढल्यास तिथे हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच पक्षाला धक्का बसला आहे. पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याने राजीनामा देत आपली नाराजी जाहीर केली आहे. यावर पक्षाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यातील वॉर्ड क्रमांक ८४ आणि प्रभाग क्रमांक १८ मधील मनसेचे शाखा अध्यक्ष माजिद शेख या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. या कारणास्तव मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे.

या राजीनाम्याबाबत माजिद शेख म्हणाले की, २००९ पासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम करत असून शाखा अध्यक्ष आहे. माझ्या प्रभागात हिंदू-मुस्लिम एकत्रित राहतात. मी माझ्या भागात पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्यामुळे मी शहर अध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष यांच्याकडे राजीनामा दिला आहे.

राजीनाम्यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असल्याची शक्यता आहे. आमचे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील. काही लोक गैरसमज करुन देतात, त्यातून हे झाले असावं. पण यातून मार्ग निघेल. कोणत्याही प्रार्थनेला राज ठाकरेंचा विरोध नाही, ती करण्याचा हक्क प्रत्येकाला असून त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये, असे स्पष्ट सांगितले होते. लोक जर त्याची काळजी घेणार असतील, तर आमचे काहीच म्हणणे नसल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

आव्डाह यांनी द्वेष परसवू नका अशी विनंती केल्यासंबंधी विचारले असता देशपांडे म्हणाले की, १९९९ साली पक्ष स्थापन झाल्यापासून मराठा-ब्राह्मण, मराठा विरुद्ध ओबीसी अशी जातींमध्ये भांडणे लावली, त्यांनी अक्कल शिकवू नये. महाराष्ट्राची काळजी राज ठाकरेंना आव्हाडांपेक्षा जास्त आहे.

दरम्यान गृहमंत्र्यांनी मर्यादा पाळण्याचे आवाहन केल्यासंबंधी बोलताना देशपांडे म्हणाले की, मला राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना एकच सांगायचे आहे की आम्हाला अक्कल शिकवण्याआधी आपण किती जातींमध्ये, कोणामध्ये भांडणे लावली याचा विचार करावा. राज ठाकरेंना महाराष्ट्राची काळजी असल्यामुळे कोणती गोष्ट कशी बोलायची, हाताळायची आम्हाला कळते. त्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे. जर कायद्यात ५० डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको असा नियम असेल, तर त्याचे पालन करण्याची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे.