संजय राऊतांची संपत्ती जप्त केल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरील संपत्ती जप्ती करण्याची कारवाई ईडीने केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर यात त्यांनी सडकून टीका केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले होते की संजय राऊत यांनी १२ पानी पत्र लिहिले किंवा काहीही केले तरी कारवाई होईल, असे म्हणत राऊतांना टोला किरीट सोमय्यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.

किरीट सोमय्या म्हणाले, प्रविण राऊतचे मित्र स्नेही संजय राऊत, उद्धव ठाकरेंचे उजवे हात जे प्रविण राऊतचे मित्र आहेत, स्नेही आहेत आणि भागिदार आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नींचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. ईडीने आज कारवाई करून संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.

आधीच संजय राऊत यांना लक्षात आले म्हणून त्यांनी १० महिन्यांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. काही दिवस ईडीची कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे, ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

किरीट सोमय्या म्हणाले, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितले होते की १२ पानी पत्र संजय राऊत यांनी लिहिले किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले किंवा मनवानी यांच्या नावाने ईडीचे अधिकारी किरीट सोमय्यांवर आरोप केले, तरी कारवाई होईल. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करून केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्यांचे तोंड बंद करता येईल, परंतू कारवाई होणार आहे.

आज संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात १०४८ कोटीचा घोटाळा, गोरेगाव पत्राचाळ, प्रविण राऊत मुख्य आरोपी, एचडीआयएल पीएमसी बँकेचे पैसे, तो पैसा गेला. अलिबागमध्ये त्या पैशातून जमीन घेण्यात आली, दादरमध्ये फ्लॅट घेण्यात आला. दिशाभूल करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ५५ लाख रुपये ईडीला परत करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.