मी तुमच्या बापाला घाबरत नाही; संजय राऊतांची ईडीच्या कारवाईनंतर आगपाखड


मुंबई – आज संजय राऊत यांच्या अलिबागमधील प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅटवर ईडीने जप्तीची कारवाई केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांवर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर आजच्या कारवाईनंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊतांवर परखड शब्दांत टीका केली होती. सोमय्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषेत किरीट सोमय्यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केला.

आधीच लक्षात आले म्हणून संजय राऊत यांनी १० महिन्यांपूर्वी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. काही दिवस ईडीची कारवाई सुरू होती. माहिती आमच्याकडे देखील येत होती. संजय राऊत यांची गेले दोन महिने धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, नील आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो, असे किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर देताना आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यांचा एकेरी उल्लेख करत राऊत म्हणाले, किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात न्यायालयात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो?, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत किंवा शिवसेना अशा कारवायांनी झुकणार नाही, वाकणार नाही. याच घरात येऊन काही महिन्यांपूर्वी भाजपच्या लोकांनी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करा, अशा धमक्या दिल्या होत्या. नाहीतर तुम्हाला खूप संकटांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले होते, असे राऊत यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊतांनी आजच्या कारवाईनंतर भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. राजकीय दबावाखाली तपास यंत्रणा कशा काम करत आहेत, हे तुम्ही पाहात आहात. संपत्ती म्हणजे एखाद्याचे राहाते घर असेल, कष्टाच्या पैशातून जुनी संपत्ती घेतली असेल, त्याचा संबंध कुठेतरी जोडायचा आणि जप्त करून दबाव आणायचा. मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, हे लक्षात घ्या. आजही मला त्यांचे आशीर्वाद असल्याचे राऊत म्हणाले.