राज ठाकरेंच्या हनुमान चालिसा वक्तव्यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांची टीका


मुंबई – २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मनसेचा पाडवा मेळावा दोन वर्षांनी आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरेंची ही सभाही नेहमीप्रमाणेच गाजली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्या, असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर यावर आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दीपाली सय्यद यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विचारले की राज ठाकरे यांनी अजान जर सुरु असेल, तर त्याच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असे वक्तव्य केले होते. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? दीपाली यावर म्हणाल्या, राजजींचं हे वक्तव्य मला पटलेले नाही. हे बोलून तुम्ही दंगली करत आहात वाद करत आहात. प्रत्येकाचा धर्म त्याच्यासाठी मोठा किंवा महत्त्वाचा असतो. तुम्हाला जर या गोष्टीचा त्रास होतो असेल तर न्यायालय आहे, तिथे जा. याआधी तिहेरी तलाकवर निर्णय मिळाला आताही मिळेल. मला असे वाटतं की त्यांनी जर ही गोष्ट त्या पद्धतीने केली असती, तर ते उत्तम झाले असते.