हे आहे ६ हजार वर्षे जुने छिन्नमस्तिका देवी मंदिर

देशात सध्या चैत्री नवरात्राचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नऊ दिवसांच्या या नवरात्र उत्सवात देशभरातील देवी मंदिरात भाविक गर्दी करत आहेत. या काळात दुर्गामाता विविध स्वरुपात पुजली जाते. झारखंड राज्याची राजधानी रांची पासून साधारण ८० किमीवर भैरवी भैडा आणि दामोदर नदीच्या संगमावर एक अनोखे देवी मंदिर आहे. छिन्नमस्तिका देवी मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे देवीस्थान ६ हजार वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. नावाप्रमाणेच या मंदिरातील देवी मस्तकाविना आहे. आसाममधील देवी कामाख्या नंतर हे दुसरे मोठे शक्तीपीठ असल्याचे सांगितले जाते.

नवरात्र काळात देशभरातून भाविक या मातेच्या दर्शनासाठी गर्दी करतात. येथील मुर्तीचे वेगळेपण म्हणजे मस्तक नसलेल्या या मूर्तीच्या हातातच कापलेले मस्तक आहे आणि तिच्या मानेतून रक्ताच्या तीन धारा वाहतात असे मानले जाते. मूर्तीच्या मस्तक नसलेल्या गळ्यात सर्प माला आणि मुंड माला आहेत. केस मोकळे सोडलेले आहेत आणि जीभ बाहेर काढलेली आहे.

पौराणिक कथेनुसार भवानी देवी तिच्या दोन मैत्रिणींसह मंदाकिनी नदी मध्ये स्नानासाठी गेली होती. स्नान करून दमलेल्या मैत्रीणीना प्रचंड भूक लागली आणि त्यांनी भवानी कडे काही तरी खायला दे अशी विनंती केली. भुकेने मैत्रिणी काळ्या पडत आहेत हे पाहून देवीने तलवारीने स्वतःचे मस्तक कापले आणि त्यातून ज्या तीन रक्तधारा उडाल्या त्यातील दोन मैत्रिणींकडे गेल्या तर एका धारेतून देवीने स्वतःची भूक भागविली. धडावेगळे केलेले मस्तक देवीने डाव्या हातात धरले आहे. या मंदिराचे उल्लेख पुराणात आहेत. महाभारत काळात हे मंदिर होते असे सांगितले जाते. या मंदिरात येऊन मातेचे दर्शन घेणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.