सीबीआयने ताब्यात घेण्यापूर्वीच अनिल देशमुख रुग्णालयात
मनी लौंडरिंग प्रकरणात आणि वसुली संदर्भात सध्या आर्थर रोड जेल मध्ये असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेण्यापूर्वीच मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याची बातमी आहे. चार एप्रिल रोजी चौकशी साठी सीबीआय अनिल देशमुख यांना कस्टडी मध्ये घेणार होती, त्यासाठी सीबीआयचे एक पथक आर्थर रोड जेल मध्ये पोहोचले पण त्यापूर्वीच अनिल देशमुख यांचा खांदा अचानक निखळला आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात न्यावे लागले असे समजते. आता अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे आणि त्यामुळे सीबीआयची चौकशी पुढे ढकलली गेल्याचे सांगितले जात आहे.
अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पलांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना सीबीआयकडे सोपविण्यासाठी जेल अधिकारी कागदपत्र पूर्तता करत आहेत. हे दोघे सीबीआयच्या ताब्यात असून त्यांना दिल्ली येथे नेऊन त्यांची चौकशी होणार आहे असे समजते. पण त्यापूर्वी मध्येच अनिल देशमुख यांना रुग्णालयात न्यावे लागल्याने अडचण निर्माण झाली आहे. देशमुख यांना ईडीने अटक केली होती आणि ते आर्थर रोड जेल मध्ये गेले सहा महिने बंद आहेत. सीबीआयकडे १०० कोटींच्या वसुली प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टने सोपविली आहे. त्यासाठी सीबीआयला अनिल देशमुख यांची कस्टडी हवी आहे.
अनिल देशमुख यांना रुग्णालयात हलवितानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात व्हीलचेअर वर बसलेले देशमुख दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांच्या चौकशी साठी एसआयटी नेमण्याची केलेली मागणी फेटाळून लावली होती आणि हा तपास सीबीआयनेच करावा असे आदेश जारी केले होते.