न्यूयॉर्क मध्ये आता गणेश मंदिर रस्ता
अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील एका प्रख्यात व प्रमुख मंदिरावरून रस्त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या रस्त्याला गणेश टेम्पल स्ट्रीट असे नाव दिले गेले असून हिंदू समुदायासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. उत्तर अमेरिकेतील हिंदू मंदिर सोसायटीच्या योगदानातून हे साध्य झाल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार याच शहरात असलेले महावल्लभ गणपती देवस्थानम वर भाविकांची फार श्रद्धा आहे. हे मंदिर फ्लशिंग, क्वीन्स कौंटी मध्ये १९७७ मध्ये बांधले गेले असून उत्तर अमेरिकेतील हे पहिले व सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. मंदिराबाहेरील रस्त्याला बाउने स्ट्रीट असे नाव आहे. गुलामविरोधी आंदोलनाचे नायक जॉन बाऊने यांच्या वरून या रस्त्याला हे नाव दिले गेले होते. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात या रस्त्याला गणेश टेम्पल स्ट्रीट असे नवे नाव दिले गेले.
या कार्यक्रमाला न्यूयॉर्क मधील भारताचे महावाणिज्य दूत रणधीर जयस्वाल, क्वीन्स बरोचे अध्यक्ष रिचर्डस, महापौर अॅडम्स उपस्थित होते. तसेच भारतीय अमेरिकी समुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला गेला आहे.