ट्विटरमध्ये एलोन मस्कनी घेतली भागीदारी, गुंतवले २२ हजार कोटी

टेस्लाचे सीईओ आणि स्टारलिंकचे प्रमुख एलोन मस्क यांनी ट्विटर या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म मध्ये २.९ अब्ज डॉलर्स म्हणजे जवळजवळ २२ हजार कोटींची गुंतवणूक करून कंपनीत ९.२ टक्के हिस्सा मिळविला आहे. त्यांनी ट्विटरचे ७३.५ दशलक्ष शेअर विकत घेतले आहेत. सोमवारी नियामक फायलिंग मधून ही माहिती जाहीर केली गेली आहे. एलोन मस्क स्वतः ट्विटर युजर आहेत आणि सोशल मिडियाच्या धोरणांवर वेळोवेळी ते टीकेची झोड उठवीत असतात.

एलोन मस्क यांच्याविषयी वेगळे काही बोलण्याची गरज नाही. कोणत्याही शेअर विषयी ते काहीही बोलले तरी त्या शेअरच्या किमती लगोलग वाढतात असे अनुभवास येते. त्यांनी ट्विटरचे शेअर खरेदी केल्याची बातमी येताच कंपनीचा शेअर त्वरित २८.४९ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. २५ मार्च रोजीच मस्क यांनी ट्विटरवरून ट्विटर युजर्सना प्रश्न विचारला होता. त्यात लोकशाही अभिव्यक्तीचे स्वातंत्र आवश्यक आहे आणि ट्विटर ते पाळत नाही यावर तुमचे काय मत आहे असे विचारले होते. विशेष म्हणजे यात ट्विटर हे स्वातंत्र पाळत नाही असे सांगणाऱ्या युजर्सची संख्या जास्त होती. यापूर्वी मस्क यांनी सोशल मिडिया अल्गोरिदम वरून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

शुक्रवारी बंद भाव ३९.३१ डॉलर्सच्या दराने मस्क यांनी २.९ अब्ज डॉलर्सचे ट्वीटर शेअर खरेदी केले असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ते स्वतःच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सुरु करू शकतात असे विधान केले होते.