असे जगताहेत युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की

रशियाने युक्रेनवर हल्ले करण्याची सुरवात केली त्याला आता ४० दिवस झाले आहेत. युद्ध संपविण्याचा अजूनही कोणताही मार्ग दृष्टीक्षेपात आलेला नाही. दरम्यान राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की पुतीन यांच्या शत्रूंच्या यादीत एक नंबरवर आले आहेत. त्यांच्या जीवाचा धोका दररोज वाढता असून झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना यांनी झेलेन्स्की कोणत्या अवस्थेत जगत आहेत याची माहिती एका मुलाखतीतून दिली आहे.

झेलेन्स्की सध्या एका गुप्त बंकर मध्ये राहत आहेत आणि त्याचे कुटुंब युक्रेन मध्येच पण दुसऱ्या ठिकाणी एका सुरक्षित बंकर मध्ये राहत आहेत. युद्ध काळात झेलेन्स्की रात्री फक्त दोन तास झोपू शकत आहेत आणि तीन चार दिवसांनी बंकर बाहेर येऊन युद्ध स्थिती जाणून घेत आहेत. ओलेना रोज त्यांच्या सुरक्षेसाठी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे.

डेली मेलच्या रिपोर्ट नुसार रशियन हल्लेखोर झेलेन्स्की यांच्या जीवावर उठले असून युद्ध सुरु झाल्यास किमान १२ ते १४ वेळा झेलेन्स्की यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे पण सुदैवाने ते प्रत्येक हल्ल्यातून बचावले आहेत. ओलेना झेलेन्स्की सांगतात सर्वसामान्य महिलांप्रमाणे मी सुद्धा माझ्या पतींची काळजी करते आहे. झेलेन्स्की मजबूत आणि सहनशील आहेत आणि देशवासीयांच्या हितासाठी लढाईत जिंकण्याची हिम्मत दाखवत आहेत.

झेलेन्स्की यांनी रशियाने कितीही हल्ले केले तरी युक्रेन सोडून जाणार नाही असे पूर्वीच जाहीर केले आहे. आजही युक्रेन मध्ये काही भागात रशियन सैनिक पोहोचू शकलेले नाहीत. झेलेन्स्की अन्य ठिकाणी बंकर मध्ये आश्रय घेतलेल्या अन्य नागरिकांना नियमाने भेटी देत आहेत आणि त्यांच्या कडून बाहेरची परिस्थिती जाणून घेत आहेत. हे नागरिक झेलेन्स्की यांच्यासाठी फार महत्वाचे आहेत असे ओलेना यांचे म्हणणे आहे.