ट्विंकल खन्नाने उडवली ‘द कश्मीर फाइल्स’ची खिल्ली


सध्या सर्वत्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आतापर्यंत २३७ कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे. या चित्रपटाचे सर्वत्र सध्या कौतुक होताना दिसत आहे. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित हा चित्रपट आहे. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने या चित्रपटाबद्दल नुकतेच भाष्य केले आहे. तिने या चित्रपटाची यावेळी खिल्लीही उडवली आहे.

नुकतेच टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या एका कॉलममध्ये ट्विंकल खन्ना हिने याबाबत भाष्य केले. ट्विंकल खन्नाने यावेळी विवेक अग्निहोत्रींच्या द कश्मीर फाइल्सवर प्रतिक्रिया देताना त्याची खिल्ली उडवली. ट्विंकल खन्ना यावेळी म्हणाली, सध्या अनेक चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रींसोबत बरोबरी साधण्यासाठी विविध शहरांच्या नावावर चित्रपट बनवत आहे. तसेच या चित्रपटाची नावे रजिस्टर करण्यासाठी या निर्मांत्यांचीही धावपळही सुरु आहे.बॉलिवूडमधील अनेक चित्रपट निर्माते सध्या ‘साऊथ बॉम्बे फाइल्स’, ‘अंधेरी फाइल्स’ यासारखे चित्रपट बनवण्याचा आणि त्याचे नाव नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना ‘द कश्मीर फाइल्स’प्रमाणे यशाची चव चाखायची असल्याचेही ती म्हणाली.

एका प्रसिद्ध निर्मात्याने काही दिवसांपूर्वी बैठकीचे आयोजन केले होते. या दरम्यान मला माहिती मिळाली की ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशानंतर आता त्या चित्रपटाच्या नावाप्रमाणे इतर चित्रपटांच्या नावांचा पूर आला आहे. सध्या अनेक चित्रपटांच्या टायटलची नोंदणी केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक मोठमोठ्या शहरांवर आधीच हक्क सांगितला जात आहे. त्यामुळे आता अनेक लोक ‘अंधेरी फाइल्स’, ‘खार-दांडा फाइल्स’ आणि ‘साऊथ बॉम्बे फाइल्स’ अशी नावे नोंदवत आहेत. पण या सर्वांमुळे मी असा विचार करत आहे की माझे सहकारी अजूनही स्वत:ला चित्रपट निर्माते कसे काय म्हणवून घेऊ शकतात? असा प्रश्नही ट्विंकल खन्नाने विचारला आहे.

आता मी सुद्धा ‘नेल फाइल’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करत असल्याचे म्हणत ट्विंकलने अप्रत्यक्षपणे द कश्मीर फाइल्सची खिल्ली उडवली. तसेच याबाबत मी माझी आई डिंपल कपाडियालाही सांगितले असेही तिने म्हटले.