लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचे आश्चर्य वाटते – सुप्रिया सुळे


मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान, त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. १९९९ मध्ये राष्ट्रवादीची शरद पवारांनी स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीका केली जात असतानाच आता राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी खोचक पद्धतीने या वक्तव्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

टीव्ही ९ मराठीशी राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केली आहे. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचे मला कौतुक आणि आश्चर्य वाटते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, हा आरोप त्यांनी याआधीही केला आहे. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांचे नाव घेऊन टीका केल्याचे सुप्रिया यांना सांगत पत्रकाराने पुढील प्रश्न विचारला. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर शरद पवारांना अशापद्धतीचे राजकारण केल्याचे ते म्हणाले, असे सुप्रिया यांना विचारण्यात आले असता त्यावरुन त्यांनी मोजक्या शब्दात राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय मोठी हेडलाइन होत नाही, महाराष्ट्राने हे ५५ वर्ष पाहिले असल्यामुळे त्यांचे नाव घेतले की कोणाचीही हेडलाइन होते. जर याचा उपयोग पक्षाला होणार असेल, तर मला त्याचा आनंद असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा खास शैलीत समाचार घेतला. राज ठाकरे यांना टीका आणि नकला करण्याशिवाय दुसरे काही जमत नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधात रान पेटवणारे, आता त्यांचीच री ओढून सरड्यासारखे रंग बदलत आहेत. राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे स्वत: जास्त जातीयवादी असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे असल्याची टिपणीही त्यांनी केली.