रशिया-युक्रेनमधील युद्धात आतापर्यंत 1417 लोकांनी गमावला जीव


नवी दिल्ली : युक्रेन-रशियामधील युद्ध 40 दिवसांनंतरही अद्याप सुरूच आहे. शेकडो सैनिक आणि निर्दोष नागरिकांचा या युद्धात बळी गेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार एजंसीच्या माहितीनुसार युक्रेनमध्ये आतापर्यंत 1417 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2038 लोकं जखमी झाली आहेत. यामध्ये मारियुपोल आणि इरपिन या भागातील आकडेवारी नाही. या भागांमध्ये लाखो नागरिक अडकल्याची माहिती आहे. तेथील आकडे समोर आल्यानंतर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी एक निवेदन जारी केले की, युक्रेनची राजधानी कीव्ह जवळील बुचा शहरात मृत नागरिकांची छायाचित्रे पाहिल्यानंतर त्यांना खूप धक्का बसला आहे. तसेच स्वतंत्र चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. युक्रेनचे प्रॉसिक्युटर-जनरल म्हणाले की, 410 नागरिकांचे मृतदेह कीव्हमध्ये सापडले आहेत. दरम्यान बुचा येथे सामूहिक कबरी सापडल्यानंतर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाकडून युद्ध गुन्हे बंद करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान शनिवारी रात्री झेलेन्स्की यांनी देशाला संबोधित करताना सांगितले की, युक्रेनला माहीत आहे की, रशियाकडे युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात अधिक दबाव आणण्यासाठी सुरक्षा दल आहेत. रशियन सैन्याचे ध्येय काय आहे? त्यांना डॉनबास आणि युक्रेनचा दक्षिण काबीज करायचा आहे. आपले ध्येय काय आहे? स्वत:चे, तुमचे स्वातंत्र्य, तुमची जमीन आणि तुमच्या लोकांचे रक्षण करा. रशियन सैन्य मारियुपोलच्या आसपास लक्षणीय संख्येने तैनात होते, जेथे बचावकर्ते अथकपणे लढत आहेत. तसेच झेलेन्स्की पुढे म्हणाले, शत्रूचे डावपेच युक्रेनच्या नागरिकांच्या धाडसामुळे आणि इतर शहरांच्या प्रतिकारामुळे उधळून लावण्याची आणि त्यांची क्षमता कमी करण्याची संधी मिळाल्याचे सांगत झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पाश्चिमात्य देशांना आवाहन केले.