हैदराबाद पोलिसांनी उधळली हाय प्रोफाईल रेव्ह पार्टी; 142 जण ताब्यात


हैदराबाद : हायप्रोफाईल रेव्ह पार्टी हैदराबादमध्ये पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी या कारवाईत १४२ जणांना ताब्यात घेतले असून ही रेव्ह पार्टी बंजारा हिल्समधील पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये सुरु होती. काही बड्या कलाकारांसह राजकीय नेत्यांच्या मुलांचाही या रेव्ह पार्टीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तिंचाही समावेश आहे.

अभिनेता नागा बाबू यांची कन्या निहारिका कोनिडेला, बिग बॉस तेलुगू रिऍलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. मेगास्टार चिरंजीवीची निहारिका कोनिडेला ही पुतणी आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोकेन आणि चरस जप्त केले आहे.

गायक आणि बिग बॉस तेलुगू रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीझनचा विजेता राहुल सिपलीगंजचाली या देखील ताब्यात घेण्यात आले आहे. 12 फेब्रुवारी रोजी हैदराबाद पोलिसांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम सुरू केली, तेव्हा राहुलने त्याचे थीम सॉंग गायले होते.

त्याचबरोबर, आंध्र प्रदेशातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आणि राज्यातील तेलुगू देसमच्या खासदाराचा मुलगा यांचा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते अंजन कुमार यादव म्हणाले की, त्यांचा मुलगा वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता आणि इतरांप्रमाणेच चुकीची माहिती पसरवली जात आहे. शहरातील सर्व पब बंद करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

अंमली पदार्थविरोधी मोहीम पोलिसांनी तीव्र केली असून त्यासाठी त्यांनी Hyderabad-Narcotics Enforcement Wing ही सुरू केले आहे. एसएचओ शिव चंद्रा यांना काही दिवसांपूर्वी हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले होते. त्यांच्या जागी टास्क फोर्सचे के.के. नागेश्वर राव यांनी जबाबदारी देण्यात आली आहे.