नारायण राणेंकडून राज ठाकरेंची पाठराखण


मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली. दरम्यान, त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. राज ठाकरेंनी महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राज्यामध्ये या भाषणानंतर सत्ताधारी विरुद्ध विरोधक म्हणजेच भाजप आणि मनसे असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. या भाषणावर वेगवेगळे नेते व्यक्त होत असतानाच कोकणामध्ये शिवसेनेसोबत ३६ चा आकडा असणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटवरुन राज यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे.


यासंदर्भात तीन ट्विट राणे यांनी केले असून त्यामधून त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधतानाच राज यांनी भाषणातून वास्तव दाखवल्याचे म्हटले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीयुत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असा टोला राणेंनी पहिल्या ट्विटमधून लगावला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपाची युती फिसकटल्याच्या मुद्द्यावरुनही राणेंनी शिवसेनेने केलेली ही गद्दारी हिंदुत्वासोबतची होती असे म्हटले आहे. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी, हे ही एक आश्चर्य आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी असल्याचे राणे म्हणाले आहेत.


तसेच, पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण असल्याचे म्हणत नारायण राणेंनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.