राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात ईडीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार!


सोलापूर – राज्याच्या राजकारणात सध्या एकमेकांवर आरोप करण्याची मालिका सुरु आहे. या आरोपांच्या मालिकेनंतर काही नेत्यांना परिणाम देखील भोगावे लागले आहेत. दकम्यान आपल्यावरील आरोप काही नेत्यांनी फेटाळूनही लावले. या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या गोंधळात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय नेहमी चर्चेत राहिली. ईडीचा वापर करुन राज्यातील सत्ताधाऱ्यांना भाजपने त्रास दिल्याच्या तक्रारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्या. पण हा आरोप भाजपने फेटाळत केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत असल्याचे वेळोवेळी सांगितले.

केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून आपल्याला त्रास देत असल्याची ओरड महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. पण प्रत्यक्षामध्ये सत्ताधारी पक्षातील म्हणजे महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ईडी आवडू लागली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून तब्बल 500 कोटी रुपयांचा सोलापूर जिल्ह्यातल्या माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ईडीकडे केली आहे.

बबन दादा शिंदे यांना त्याच्या दोन नोटिसा बजावल्या आहे. ईडीमार्फत शिंदेंची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे गेल्याच आठवड्यामध्ये काँग्रेसचे प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी वसंत मुंडे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले कृषी मंत्री दादा भुसे हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार लेखी स्वरूपात ईडीला दिली आहे.

दादा भुसे यांच्या कृषी खात्याअंतर्गत सुरू असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची विनंती वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा केल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जरी केंद्रीय संस्थांवरती आरोप लावत असले, तरी प्रत्यक्षात ईडीची विश्वासार्हता वाढल्यामुळेच की काय पण सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा एकमेकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी ईडीकडे जात असल्याचे दिसत आहे.