यामुळे ७८ वर्षांच्या वृद्धे महिलेने राहुल गांधींना दान केली आपली सगळी संपत्ती


डेहरादून – आपली संपूर्ण संपत्ती काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या नावे एका वृद्धेने केली आहे. तिची मालमत्ता आणि दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. न्यायालयात या वृद्धेने आपले मृत्यूपत्र सादर करून आपल्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत. या वृद्धेचे नाव पुष्पा मुंजियाल असे आहे.

यासंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये पुष्पा मुंजियाल या राहतात. त्यांचे वय ७८ वर्ष असून पुष्पा यांनी आपली ५० लाखांची संपत्ती आणि १० तोळे सोन्यासह त्यांची सर्व मालमत्ता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. पुष्पा मुंजियाल यांनी डेहराडून न्यायालयात एक मृत्यूपत्र सादर केले असून, त्यांच्या मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधी यांना दिले आहेत.

राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे पुष्पा मुंजियाल यांनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या विचारांनी मी खूप प्रभावित आहे आणि म्हणूनच माझी संपत्ती त्यांना देत असल्याचे पुष्पा मुंजियाल पुढे म्हणाल्या.

दरम्यान, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले की, पुष्पा मुंजियाल यांनी माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे मृत्यूपत्र आणि मालमत्तेचे मालकी हक्क राहुल गांधींना दिल्याची कागदपत्रे सोपवली आहेत.