राज्य सरकारच्या दबावाखाली माझ्यावर दाखल झाला एफआयआर – प्रवीण दरेकर


मुंबई : पोलिसांना माझ्यावर एफआयर दाखल करण्याची खूप घाई झाली होती. राज्य सरकारचा त्यांच्यावर दबाव होता. माझ्यावर कारवाईचा अट्टाहास मुख्यमंत्र्यांचा देखील होता. राज्य सरकारच्या दबावाखाली माझ्यावर एफआयआर दाखल झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांना पूर्ण माहिती देणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून जे जे काही हवे त्याची तपशीलवार माहिती पोलिसांना देणार आहे. आम्ही कुठेही अक्रास्थळीपणा करणार नाही. तपास यंत्रणेला दोष देणार नसल्याचेही दरेकर म्हणाले. तुमच्या दबाबाखाली या यंत्रणा काम करतात, असे आरोप आम्ही करु शकलो असतो. पण आम्ही असे करणार नाही, आम्ही त्याला सामोरे जात असल्याचे दरेकर म्हणाले.

यावेळी दरेकर यांनी आज कुठेही गडबड, गोंधळ होणार नाही असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. अनावश्यक गर्दी होणार नाही, याची काळजी घेणार आहे. सर्वार्थाने पोलिसांना सहकार्य केल जाईल, असे ते म्हमाले. राज्यातील अनेक गुन्ह्यात महाविकास आघाडीतील नेते आहेत. त्यामध्ये कारखाने, बँका, बलात्काराचे गुन्हे असल्याचे दरेकर म्हणाले. या सगळ्या बाबतीत सरकारचा दुजाभाव का? असा सवाल देखील दरेकरांनी केला. मी सभागृहात याची माहिती दिली होती. पण सुडाच्या भावनेने हे सरकार कारवाई करत असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे.

सरकार आमच्यावर कारवाईसाठी दबाव आणत आहे. आपल्या लोकांवर गुन्हे दाखल करायचे नाहीत, त्यांची चौकशी करायची नाही आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असे सध्या सुरु असल्याचे दरेकर म्हणाले. दरम्यान, मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस या प्रकरणात चौकशी करणार आहेत. प्रवीण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते धनंजय शिंदे यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर दरेकरांना विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून, त्यांना आज माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.