राज ठाकरे-गडकरी भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चेवर संजय राऊत म्हणाले…


नवी दिल्ली – गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राज ठाकरेंची भेट घेतली. नितीन गडकरी हे रविवारी रात्री राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी पोहोचले होते. शिवसेना, राष्ट्रवादीवर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे पुन्हा एकदा भाजप-मनसे युतीबद्दल चर्चा रंगू लागली आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दरम्यान शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.

त्यांना भेटीबद्दल विचारले, असता ते म्हणाले की, अशा भेटीगाठी होत असतात. आम्हीही अनेकांना भेटतो, आमच्याकडे अनेकजण येतात. प्रत्येक भेटीमागे राजकारण असते, असे नाही. त्यावर आम्ही बोलावे असे काही नाही. दरम्यान युतीच्या शक्यतेबद्दल विचारलं असता त्यांनी त्याविषयी फार काही बोलावे, अशी काही स्थिती महाराष्ट्रात, देशाच्या राजकारणात नाही. रात गई, बात गई, असं उत्तर दिले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली या सर्व महापालिका ताकदीने लढेल. मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कितीही असंतृष्ट आत्मे एकत्र आले, मराठी माणसे, मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कितीही कटकारस्थाने केली तरी त्या कारस्थानांच्या छाताडावर पाय रोवून आम्ही मुंबई पालिकेवरचा भगवा झेंडा कायम ठेवू ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही षडयंत्र रचली, तरी काही फऱक पडत नसल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील पोटनिवडणुकीत पैसे घेतल्यास मतदारांच्या मागे ईडी लागू शकते, असे म्हणाले आहेत. संजय राऊत यासंबंधी बोलताना म्हणाले की, कोल्हापूरच कशाला…गोव्यातील पणजी, साखळी मतदारसंघातील मतदारांच्या मागे आधी ईडी लावा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील असे काही मतदारसंघ मी सांगू शकतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला, असला तरी काही मतदारसंघात ईडी लावणे गरजेचं आहे.

ते पुढे म्हणाले की, फार चांगली सूचना चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला, तो पणजी आणि प्रमोद सावंत जिंकले. तो साखळी या दोन मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली, तर आम्ही स्वागत करु. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चांगले आहे, महाराष्ट्राचेनंतर पाहू काय करायचे. पण सुरुवात पाच राज्यातील निकाल, मतदारांवर निर्माण केलेला प्रभाव याची ईडी चौकशी होणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटील यांना यात पुढाकार घेतला, तर मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढाईत उभा राहीन.

युपीए अध्यक्षपदात आपल्याला रस नसल्याचे शरद पवारांनी सांगितलं आहे. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार हे फार मोठे नेते आहेत, त्यांचा सन्मान, आदर आम्ही सर्वच करतो. सक्षम नेतृत्वाची गरज देशातील विरोधी पक्षाला आहे. देशातील समविचारी पक्ष एकत्र यावेत, यासाठी काही भूमिका ठरत आहेत. शरद पवारांच्या सक्रिय सहभागाशिवाय एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही. शरद पवारांच्या मनात काय आहे आम्हाला माहिती असते.

ते पुढे म्हणाले की, या देशात मोदींना पर्याय तसेच विरोधी पक्षांची एकजूट शरद पवारांच्या प्रयत्न, पुढाकाराशिवाय होऊ शकत नसल्याचे माझे स्पष्ट आहेत. या एकजुटीचे नेतृत्व करण्यासाठी देशात अनेक विरोधी नेते आहेत, जे सक्षम आहेत, पण पुढाकार घेण्यासाठी पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पुढे यावे, असे आमचे मत आहे.

शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. ते यावर म्हणाले की, कोणती कोणाची टीम आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या वाफा दवडत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात शिवेसना मेरिटमध्ये आली आहे म्हणून मुख्यमंत्री झाला. ज्या राज्याचं नेतृत्व शिवसेना करत आहे, शिवसेनेचा मुख्यमंत्री करत आहे, याचा अर्थ त्यांना चांगले कळते, निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि राज्यातील लोकांचा पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सलग तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये आले आहेत. हे कोणाला कळत नसेल, तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल.