गडकरी- राज ठाकरे भेटीने राजकीय चर्चांना उधाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या रविवारी रात्री झालेल्या भेटीने राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रविवारी नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शनिवारीच राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून केलेल्या भाषणात स्फोटक विधाने केली होती. मशिदीवरील लाउडस्पीकरचा आवाज कमी झाला पाहिजे अथवा त्यापेक्षा जास्त आवाजात मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजविले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता त्या पार्श्वभूमीवर झालेल्या गडकरी- ठाकरे भेटीने राजकीय तर्कवितर्क होऊ लागले आहेत.
राज ठाकरे यांनी या भेटीबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र नितीन गडकरी यांनी ही भेट राजकीय नाही. गेली ३० वर्षे राज ठाकरे यांच्या कुटुंबाबरोबर आमचे घरोब्याचे संबंध आहेत. त्यांनी नवे घर बघायला बोलावले होते त्यामुळे घर बघायला आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीच्या भेटीसाठी ठाकरे यांच्या घरी गेल्याचे सांगितले. ठाकरे यांच्या घरातील गडकरी यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केले गेले आहेत.
शिवतीर्थावरील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी आपला कुठल्याही प्रार्थनेला, धर्माला विरोध नाही पण माझ्या धर्माचा अभिमान आहे असे सांगितले होते आणि राष्ट्रावार्दी कॉंग्रेस प्रमुख शरद पवार जाती धर्मावरून समाजात फुट पाडत आले आहेत अशी टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमित शहा आणि मोदी यांनी फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील हे सांगितल्याचे चांगलेच ठाऊक होते पण निवडणूक निकालानंतर भाजप स्वबळावर सरकार बनवू शकत नाही हे लक्षात आल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा पवित्रा घेतल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.