इम्रानखान यांनी सामना जिंकला पण कर्णधारपद गेलेच

रविवारी पाकिस्तान मध्ये राष्ट्रपतींनी संसद भंग करण्यात येत असल्याचे जाहीर केल्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. पाकिस्तान घटनेच्या अनुच्छेद २२४ प्रमाणे नवीन पंतप्रधान येईपर्यंत इम्रान खान १५ दिवस पंतप्रधान राहतील पण त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसेल असे समजते.

जिओ न्यूजने दिलेल्या बातमीनुसार कॅबिनेट सेक्रेटरीएटने अधिसूचना जारी केल्यावर राष्ट्रपतीनी संसद भंग केली आणि ३ एप्रिल २०२२ पासून इमरान अहमदखान नियाजी तत्काळ प्रभावाने पंतप्रधान राहिलेले नाही असे जाहीर केले. तत्पूर्वी विरोधी पक्षांनी इमरान खान सरकारविरुद्ध आणलेला अविश्वास ठराव माजी उपसभापती कासीम सूर यांनी असंविधानिक ठरवून फेटाळून लावला आणि हा ठराव परकीय शक्तींच्या दबावाखाली आणल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. कारण अविश्वास ठराव मंजूर होणार आणि पुढील दीड वर्ष आपल्या हाती सत्ता येणार अशी विरोधी पक्षांची खात्री होती.

पण ठराव फेटाळला जाताच इम्रान खान यांनी संसद भंग करण्याची मागणी केली आणि राष्ट्रपतींनी ती मान्य करून संसद भंग केली. पाकिस्तान मध्ये आता ९० दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत आणि तोपर्यंत देशाचा कारभार प्रशासनाच्या हाती  राहणार आहे.