‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातून ३२ वर्षांपूर्वी काश्मिर खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या झालेल्या हत्या याची कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. त्याचबरोबर अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आणि प्रभासचा ‘राधे श्याम’ या चित्रपटांनाही चांगलीच टक्कर दिली. या चित्रपटाच्या यशानंतर बरेच कलाकार दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.
विवेक अग्निहोत्रींचा कंगनाला आपल्या चित्रपटात घेण्यास स्पष्ट नकार
अभिनेत्री कंगना राणावत ‘द कश्मीर फाइल्स’नंतर लवकरच विवेक अग्निहोत्रींसोबत काम करणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. पण कंगनासोबत कोणताही चित्रपट विवेक अग्निहोत्रींनी अद्याप साइन केलेला नाही. त्याचबरोबर कंगनासोबत काम करण्याबाबत त्यांना विचारणा झाल्यावर त्यांनी यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला.
एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीला अभिनेत्री कंगनासोबत भविष्यात काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले, कोणत्याही स्टारची मला गरज नाही, मला फक्त एक कलाकार हवा आहे, जो उत्तम अभिनय करू शकेल. जेव्हा मी १२ वर्षांपूर्वी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी मी माझ्या मतानुसार चित्रपट तयार करणार असा निर्णय घेतला होता. त्यामुळे एखाद्या स्टारसोबत काम करण्यापेक्षा उत्तम अभिनय असलेल्या कलाकारासोबत काम करणे मला आवडते.
दरम्यान सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामुळे विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर बरेच चर्चेत आहेत. एकीकडे त्यांच्या चित्रपटाचे कौतुक होताना दिसतंय तर दुसरीकडे काही लोकांकडून या चित्रपटाला विरोधही होताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्रींच्या कामाबद्दल बोलायचे तर ते सध्या ‘दिल्ली फाइल्स’ चित्रपटाची तयारी करत आहेत.