मुंबई : आज वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली, यावेळी बोलताना शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचे वातावरण तयार केले जात असून सरकारमध्ये अजिबात मतभेद नसल्याचे सांगितले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याच्या चर्चांना गेले काही दिवस राज्यात राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यावर भाष्य करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजिबात मतभेद नाहीत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले आहे की, महाराष्ट्र कर संकलनात देशात प्रथम क्रमांकाच राज्य ठरले आहे. ही अभिमानाची बाब आहे. जीएसटी विभाग देशाचा आणि राज्याचा मोठा आधार आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट असल्याचे वातावरण निर्माण केले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहे. महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणारे राज्य नसते, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी करू नका.
उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी मान्यवर जीएसटी भवनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.