जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती


महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध तब्बल दोन वर्षानंतर हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही. कोरोना संपला आहे, अशी आशा बाळगत आज उत्साहाने गुढीपाडवा साजरा केला जात आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने चिंता वाढवणारी माहिती दिली आहे. कोरोनाचा नवा XE नावाचा व्हेरिएंट हा ओमिक्रॉनच्या BA.2 सब-व्हेरिएंटपेक्षा दहा टक्के जास्त संक्रमणक्षम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

ओमिक्रॉनचा BA.2 सब-व्हेरिएंट हा सामान्य संसर्गजन्य प्रकार आत्तापर्यंत मानला जात होता. अनेक देशांमध्ये BA.2 हा पसरला असून युकेमध्ये नवीन रुग्ण याच व्हेरिएंटमुळे वाढले आहेत. परंतु नवीन XE हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2. या दोन प्रकारातून म्युटेट होऊन तयार झाल्याचे म्हटले जाते. XE रीकॉम्बिनंट हा व्हेरिएंट सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला. तेव्हापासून या व्हेरिएंटच्या ५०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

XE हा BA.2. च्या तुलनेत १० टक्के जास्त वेगाने पसरतो, असे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. परंतु याची खात्री करण्यासाठी आणखी संशोधन आणि अभ्यास करणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या (UKHSA) अभ्यासानुसार, सध्या XD, XE आणि XF असे तीन नवीन रीकॉम्बिनंट स्ट्रेन वेगाने पसरत आहेत.