श्रीलंकेत महागाईमुळे संतप्त जनतेकडून जाळपोळ


कोलंबो – अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर श्रीलंकेतील संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचार आणि गोंधळाचे वातावरण राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात निर्माण झाले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे आणीबाणी जाहीर केली.

शुक्रवारी हजारो नागरिकांनी राष्ट्रपती भवनाबाहेर निदर्शने केली. संतप्त लोक राष्ट्रपतींना पायउतार होण्याचे आवाहन करत आहेत. सध्याच्या सरकारची धोरणे आर्थिक परिस्थितीला कारणीभूत असल्याची नागरिकांची भावना आहे. तर कोलंबोमध्ये हिंसाचार सुरूच आहे. काही संतप्त लोकांनी रस्त्यावरील वाहने पेटवली. पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.

सुरक्षा दल आणि सामान्य जनता आर्थिक संकटामुळे आमनेसामने आली आहे. जनता सरकारच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरली आहे. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून फायर गॅस सोडण्यात आला. आतापर्यंत श्रीलंकेत झालेल्या हिंसाचारात 10 जण जखमी झाले आहेत. तर 50 हून अधिक जणांना ताब्यातही घेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे स्पेशल टास्क फोर्सला पाचारण करावे लागले आहे, पण परिस्थिती नियंत्रणात येत नाही.

1 एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी जारी केली आहे. जनता स्त्यावर उतरल्यामुळे सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

श्रीलंकेची परिस्थिती एवढी वाईट आहे की, शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई संपली आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. विशेष म्हणजे तेथे पेट्रोलपेक्षा दूध महाग झाले आहे.