गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिले प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश


मुंबई – राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दिली आहे. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांना देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात प्रभाकर साईलच्या मृत्यू प्रकरणी चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे.

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. एनसीबीने केलेल्या या कारवाईत प्रभाकर साईल हा पंच होता. एनसीबीच्या या कारवाईवरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. साईल हा एनसीबीच्या कारवाईत असलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आरोप सुरू केल्यानंतर साईलने केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली होती.

दरम्यान राष्ट्रवादीने प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे की, एनसीबीने कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणात फर्जीवाडा करुन केलेल्या कारवाईतील एनसीबीचा पंच आणि एनसीबीचा फर्जीवाडा प्रतिज्ञापत्राद्वारे उघड करणारा प्रभाकर साईल याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी आहे, पण या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असून राज्य सरकारने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.