जालना – परतूर-मंठा विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात दलित समाजाबाबत असभ्य वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शुक्रवारी रात्री तालुका जालना पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर शंकरराव घेवंदे यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार आमदार लोणीकर यांची मोबाईल फोनवरील संभाषणाचे ध्वनीमुद्रण घेवंदे यांच्याकडे समाज माध्यमातून आले. संभाषणात आमदार लोणीकर हे महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकीच्या आवाजात बोलत होते.
लोणीकर हे त्यांच्या घराचे मीटर काढून नेल्याच्या संदर्भाने बोलत असताना झोपडपट्टीतील दलित वस्तीत जाऊन आकडे काढावेत, असे संभाषणातून महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलत होते. संभाषणाची ध्वनीफित समाज माध्यमातून पसरल्याने दलित समाजाचा अपमान केल्याचा आरोप करून या प्रकारामुळे आपल्याही भावना दुखावल्याचे दिनकर घेवंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.