थोडा भेदभाव होत असल्यामुळे मतभेदाच्या बातम्या समोर येत आहेत – अजित पवार


मुंबई – येथे थोडा भेदभाव होतो मुख्यमंत्री साहेब. मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला तुम्ही येतात. पण आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नसल्यामुळे मतभेदाच्या बातम्या येतात. त्यामुळे तुम्हीच काय ते खरे सांगा, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जीएसटी भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित होते. पण, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे गंभीर नव्हते, तर गमतीशीर होते. अजित पवारांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली.

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे उपरोधिक वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटले की, मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्याचे त्यांनी म्हटले. जीएसटी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी म्हटले की, जीएसटी भवन भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या साक्षीने झाला आहे. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवून मुख्यमंत्री यांनी ही भेट दिली आहे. मागील काळात आम्ही सत्तेत असताना आम्हाला ही वास्तू उभारायची होती. खर तर हे काम मागील सरकारने पुढे घेऊन जायला पाहिजे होते. पण, आता महाविकास आघाडी सरकारने हे काम हाती घेतले आहे. अर्थ विभागाचे हे काम असल्यामुळे कोणताही निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.

ज्या ठिकाणाहून कर मिळतो, त्या ठिकाणी चांगल्या सेवा दिल्या पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले. जीएसटी कार्यालयात येणार स्टाफ थेट मेट्रोने येता यावा यासाठी मेट्रो स्टेशन इमारतीच्या आतमध्ये करत आहोत. काम करतांना कर्मचारी यांना आनंद वाटला पाहिजे, अशा इमारती उभ्या राहिल्या पाहिजे असेही अजित पवार यांनी सांगितले.