नवी दिल्ली – आपल्या कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन भारतातील नागरिकांना लसवंत करण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या भारत बायोटेक कंपनीने तात्पुरत्या काळासाठी कमी करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय फॅसिलिटी ऑप्टिमायझेशनसाठी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. भारत बायोटेकनुसार, हा निर्णय प्रोक्योरमेंट एजन्सींचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी आणि सध्या लशीच्या मागणीत झालेली घट लक्षात घेण्यात आला आहे.
यामुळे भारत बायोटेकने घटवले कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे उत्पादन
यासंदर्भात भारत बायोटेकने सांगितले की, कोरोनाच्या आणीबाणीला तोंड देण्यासाठी मागील वर्षी लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू होते. कोव्हॅक्सिनची लस तयार करण्यासाठी उत्पादनाशी संबंधित बाबी नव्याने उभारण्यात आल्या होत्या. आता याच बाबींना अद्यावत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात काही अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध नव्हती. पण, त्यामुळे लशीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही, अथवा गुणवत्तेसोबत तडजोडही केली नाही, असेही कंपनीने म्हटले.
सर्व जागतिक नियामक आवश्यकतांची कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन पूर्तता करते याची खात्री करण्यासाठी कंपनी आवश्यक ती पावले उचलण्यास कटिबद्ध आहे. त्यातूनच लस उत्पादनाशी निगडीत सुविधा अपग्रेड करण्याचे प्रयत्न सुरू आहे. लस उत्पादक कंपनी म्हणून लस सुरक्षितेला कायम प्राधान्य असेल असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.