या देशांत असा साजरा होतो ‘एप्रिल फुल’

१ एप्रिल हा दिवस जगभरात मुर्खांचा दिवस म्हणून साजरा होतो. बॉलीवूड मध्ये तर या नावाने एक चित्रपट आला होता. काही देशात एप्रिल फुल साजरा करायची पद्धत वेगळी आहे. कुणाला तरी उल्लू बनविणे हा या प्रथेचा मुख्य उद्देश. तसेच थोडी मौज मस्ती असे या दिवसाचे स्वरूप आहे.

फ्रांस मध्ये हा दिवस ‘ पॉईसन डी’ ए विल’ या नावाने साजरा होतो. शाळेत विद्यार्थी कागदाचे मासे बनवितात आणि मित्राच्या पाठीवर न कळत ते चिकटवले जातात. ज्याच्या पाठीवर मासा चिकटविला गेला त्याला ते कळले नसेल तर त्याच्या जवळ जाऊन पॉईसन डी’ ए विल असा ओरडा केला जातो. याचा अर्थ आहे ‘एप्रिल मासा’. ग्रीस मध्ये अनेक प्रकारे हा दिवस साजरा होतो. एखाद्याला मूर्ख बनविण्यात यश आले तर त्याला संपूर्ण वर्ष चांगले जाते असे मानले जाते. मूर्ख बनविणारी व्यक्ती शेतकरी असेल तर त्याचे शेत चांगले पिकते असाही समज आहे.

ब्राझील मध्ये’ ओ दिया दास मेंतायार’ म्हणजे खोटयाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा होतो. मात्र यात कुणाचे कुठल्याही प्रकारचे नुकसान केले जात नाही. १८२८ पासून हा दिवस येथे साजरा होतो असे म्हणतात. या दिवशी एका पत्रात ब्राझील सम्राट डॉन पेट्रो याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. अर्थात हे सफेद झुठ होते. त्यामुळे कुणी रागावले नाही.

आयर्लंड मध्ये अनेक प्रकारे हा दिवस साजरा होत असला तरी दुपारपर्यंत त्यांची मुदत असते. त्या नंतर कुणी असा प्रयत्न केला तर त्याला वेडा म्हटले जाते. यात प्रसिद्धी माध्यमे सुद्धा सामील असतात. स्कॉटलंड मध्ये एप्रिल फुल दोन दिवस साजरा होतो. पहिल्या दिवशी ‘ हंट द गॉल डे’ या रुपात म्हणजे अफवा पसरविणे आणि दुसर्या दिवशी एकमेकांना शेपट्या चिकटविणे असे उपक्रम होतात.