हे शूज आहेत स्मार्ट, काढतील फोटो आणि चार्ज करतील फोन
आजकाल जगात चोहीकडे स्मार्ट डिव्हायसेसचे राज्य दिसून येत आहे. इंटरनेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य सोपे करून टाकले आहे. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, स्मार्ट कार, स्मार्ट होम, स्मार्ट स्पीकर्स अश्या या लांबलचक यादीत आता स्मार्ट शूजचा प्रवेश झाला आहे. आयएक्सआयजीओ (एग्झीगो)ग्रुपचे सीईओ आलोक वाजपेयी यांनी प्रथम ही माहिती ट्रॅव्हल पोर्टल वर दिली आहे.
शूज एक्स असे या स्मार्ट शूजचे नामकरण केले गेले आहे. या बुटात वॉटर प्रुफ युएसबी चार्जिंग पोर्ट दिले असून त्यावर स्मार्टफोन चार्ज करता येतात. खाली बॅटरी आहे. बुटात १२ एमपीचा फ्रंट कॅमेरा असून त्याच्या मदतीने सेल्फी घेता येतात शिवाय बॅक ला अल्ट्रा वाईड सेन्सर दिला गेला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या संशयित व्यक्तीची कल्पना येते. अँटी थ्रेप्ट सेन्सर मुळे चोरी होण्यापासून बचाव होऊ शकतो. जी कुणी व्यक्ती तुमच्याजवळ येऊन एखादी वस्तू चोरी करण्याचा प्रयत्न करेल त्या व्यक्तीची माहिती मिळते आणि स्मार्टफोनच्या सहाय्याने त्याला ट्रॅक करता येते.
यात ऑटोवॉर्मिंग सेल दिले गेले आहेत त्यामुळे उणे २० तापमानात सुद्धा तुमची पावले गरम राहतात. यात क्यूआर कोड स्कॅनर आहे त्यामुळे कोणताही क्यूआर कोड स्कॅन करून त्या वस्तूचे पेमेंट करता येते. यातील ट्रॅकिंग अॅप मुळे तुम्ही किती पावले चाललात, किती कॅलरी जाळल्या याची माहिती मिळते. हे शूज स्टॉक असेपर्यंतच मिळणार आहेत. त्यासाठी शूजएक्स डॉट इन वर बुकिंग करावे लागेल. बुटाच्या किमतीचा खुलासा केला गेलेला नाही.