या छोट्याश्या देशाने तयार केल्या करोनाच्या पाच विविध लसी

करोना महासाथीने जगभर उच्छाद मांडल्यावर जगातील सर्व प्रगतशील आणि बडे देश प्रचंड मोठी गुंतवणूक करून करोना विरुद्ध लसनिर्मिती करण्यासाठी झटू लागले होते तेव्हाच क्युबा या छोट्याश्या देशाने नवीन विक्रम नोंदविला होता याची माहिती आता पुढे आली आहे. या देशाने करोना विरुद्ध पाच विविध प्रकारच्या लसी बनविल्या, त्यातून देशाचे लसीकरण केलेच पण आसपासच्या देशांना या लसींचा अगदी माफक किमतीत पुरवठा करून त्यानाही लसीकरणात मोठी मदत केली आहे. विशेष म्हणजे करोना विरुद्धच्या लढाईत पाच लस विकसित करणारा क्युबा हा एकमेव देश ठरला आहे.

अमेरिकेशी दीर्घकाळ युद्ध करून अखेरी १९५९ मध्ये हुकुमशाहीतून मुक्त झालेल्या क्युबाने फिडेल कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली एक पक्षीय लोकशाही स्वीकारली. अर्थात त्यानंतर सुद्धा या देशात अनेक क्रांती झाल्या पण प्रगतशील देश जे करू शकले नाहीत ते क्युबाने करून दाखविले आहे. गेल्या काही दशकात या देशात सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय चिकित्सा सेवा आणि बायोटेक्नोलॉजी मध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. जगात जेथे कुठे चिकित्सा सेवेची गरज आहे तेथे सर्वाधिक डॉक्टर्स क्युबा मधून जातात. करोना लस विकसित करताना त्यांनी अन्य देशांना लस स्वस्त दराने देण्याचा पराक्रम केला आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातील औषध निर्मिती कंपन्या जेव्हा त्यांच्या लसी साठी भरमसाठ किमती आकारत होत्या, तेव्हा क्युबाने पाच लसी विकसित करून गरीब देशांना त्या स्वस्तात पुरविल्याचे समोर आले आहे.

येथील प्रयोगशाळांवर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे. जनतेच्या पैश्यातून प्रयोगशाळा चालतात. विकसित केल्या गेलेल्या पाच लसीपैकी तीन लसी मधून देशातील ९३ टक्के लसीकरण केले गेले आहे. अन्य देश जेव्हा लसीच्या पहिल्या ट्रायल घेत होत्या तेव्हा या देशात तीन ट्रायल पूर्ण होऊन लसीकरण सुरु झाले होते. दोन वर्षांवरील बालकांना लस देणारा हा पहिला देश आहे. आर्जेन्टिना, मेक्सिको, व्हेनेझुएला, निकाराग्वा, बोल्विया, इराण, सिरीया, व्हिएतनाम या देशांना क्युबाने लस पुरवठा केला आहे. अमेरिकेचे प्रतिबंध असूनही योजनाबद्ध रीतीने त्यांनी स्वतःच्या सामाजिक आणि आर्थिक गरजा लक्षात घेऊन विकास, शिक्षण, विज्ञानात प्रगती केली आहे. येथील डॉक्टर गरीब देशात जाऊन तेथील डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यात आघाडीवर आहेत.