विराट कोहलीची ब्रांड व्हॅल्यु घसरली

सेलेब्रिटी ब्रांड व्हॅल्यु  मध्ये भारताचा क्रिकेटपटू विराट आजही टॉप वर असला तरी कन्सल्टिंग फर्म डफ अँड फेल्प्स च्या रिपोर्ट नुसार विराटची २०२० मध्ये असलेली २३.७७ कोटी डॉलर्स म्हणजे १८०६.६१ कोटी रुपयांची ब्रांड व्हॅल्यु  २०२१ मध्ये घसरून १८.५७ कोटी डॉलर्स म्हणजे १४११.३९ कोटींवर आली आहे. विराटची ब्रांड व्हॅल्यु एक वर्षात २२ टक्क्यांनी घसरली आहे.

टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहली याला २०२१ हे वर्ष म्हणावे तसे चांगले गेलेले नाही. खेळातील खराब कामगिरी मुळे त्याला क्रिकेटच्या सर्व फॉर्मेट मधील कप्तानी सोडावी लागली आणि आज तो आयपीएल मध्ये नुसता फलंदाज म्हणून खेळतो आहे. २०२१ मधल्या टी २० वर्ल्ड कप मध्ये विराट सेनेचा पराभव झाला याचा थेट परिणाम विराटच्या क्रिकेट करियरवर झालाच आहे पण त्याची ब्रांड व्हॅल्युही ४०० कोटींनी घसरली आहे.

या यादीत टॉप पाच सेलेब्रिटी मध्ये विराट १८.५७ कोटी डॉलर्स, रणवीर सिंग १५.८३, अक्षय कुमार १३.९६, आलीया भट्ट ६.८१ आणि धोनी ६.१२ कोटी डॉलर्स यांचा समावेश आहे. धोनीने २०१९ मध्येच क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे मात्र त्याची कमाई वाढतीच राहिली आहे. २०२१ मध्ये करोना मुळे फारसे चित्रपट रिलीज होऊ शकले नाहीत त्यामुळे या वर्षीच्या यादीत बॉलीवूडवर खेळाडूंनी मात केल्याचे दिसले आहे. टॉप २० मध्ये सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा, पीव्ही सिंधू यांचाही समावेश आहे.