भ्रष्ट पाकिस्तानी सेनेचे आहेत दीड लाख कोटींचे व्यवसाय

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल अशी लक्षणे दिसत असतानाच पाकिस्तानी लष्कर गेली ७० वर्षे राजसत्तेवर नेहमीच कसे शिरजोर राहिले आहे याची माहिती नव्याने पुढे येऊ लागली आहे. पाकिस्तानी लष्कराचा सत्तेत नेहमीच हस्तक्षेप राहिला आहे कारण त्यांच्या हातात प्रचंड आर्थिक साम्राज्य एकवटलेले आहे. संसदेत सादर झालेल्या कागदपत्रातून ही माहिती पुढे आली आहे.

या कागदपत्रानुसार पाकिस्तानी लष्कर बेकरी पासून पेट्रोल पंप, शाळा, कॉलेज, बँका, होजिअरी, विविध प्रकारच्या कंपन्या, सिमेंट, डेअरी अश्या विविध प्रकारचे ५० पेक्षा जास्त व्यवसाय चालविते. या साऱ्या व्यवसायातून दीड लाख कोटींची उलाढाल होते आणि लष्करी अधिकाऱ्यांचे किमान ८० हजार कोटी स्विस बँकेत दडविले गेले आहेत. लष्कराच्या ताब्यात किमान दोन लाख कोटींची जमिन असून त्याचे सर्व व्यवहार लष्कराच्या कडून केले जातात. माजी लष्कर प्रमुख सलीम बाजवा यांना जनरल पापा जोन्स म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी कुटुंबियांच्या नावे पिझा चेन पापा जोन्स मध्ये २२ हजार कोटी गुंतविले आहेत.

क्रेडीट सुईसच्या रिपोर्ट नुसार किमान २५ माजी लष्करी अधिकाऱ्यांनी स्विस बँकेत ८० हजार कोटी जमा केले आहेत. आठ प्रमुख शहरात डिफेन्स अकौंट अॅथोरिटी कडे २ लाख कोटी रकमेच्या जमिनी आहेत. पनामा पेपर्स मधून लष्करी अधिकाऱ्यांची कोट्यावधींची अवैध संपत्ती उजेडात आली होती असेही समजते.