देशातील २५ राज्ये ऑक्सिजन निर्मिती मध्ये स्वयंपूर्ण

करोनाची चौथी लाट भारतात येणार का याविषयी अजून नक्की काही सांगता येत नसले तरी त्यासाठी देश पूर्ण सज्ज आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात आलेले ऑक्सिजन पुरवठा संकट लक्षात आल्यावर केंद्र सरकारने देशात प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन संयंत्र लावण्याची योजना आखली आणि आज देशातील बहुतेक राज्ये ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या बाबतीतला अहवाल नुकताच सादर केला आहे.

करोना दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नव्हता तेव्हा परदेशातून आणि देशातील अन्य राज्यातून ऑक्सिजन आणून सर्वाधिक बाधित राज्यांना पुरविला गेला होता. त्यानंतर लगोलग केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये करार करून प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे बसविण्याची योजना आखली गेली होती. आज घडीला देशातील ३६ पैकी २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ऑक्सिजन बाबत १०० टक्के स्वयंपूर्ण झाले आहेत. या राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन संयंत्रे सुरु झाली आहेत आणि त्यातून स्थानिक मोठ्या रुग्णालयांना तसेच आसपासच्या हॉस्पिटलना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. उर्वरित ११ राज्यात या संदर्भातील थोडे काम बाकी आहे.

प.बंगाल, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, नागालँड, लदाख राज्यात दोन किंवा त्यापेक्षा थोडी जास्त ऑक्सिजन उत्पादन केंद्रे सुरु झालेली नाहीत तर राजस्तान, मेघालय, मिझोरम, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल मध्ये प्रत्येकी एक केंद्र सुरु होणे बाकी आहे. केंद्र सरकारने देशात १५६१ ऑक्सिजन उत्पादन संयंत्र मंजूर केली होती त्यातील १२२५ स्थापन झाली आहेत. यासाठी पंतप्रधान मदत कोशातून निधी दिला गेला तर ३३६ केंद्रांसाठी अन्य मंत्रालयातून निधी दिला गेला. विशेष म्हणजे १५६१ पैकी १५४१ म्हणजे ९८.७१ टक्के केंद्रातून ऑक्सिजन उत्पादन सुरु झाले आहे.