पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील कार अपघातग्रस्त, ठाकरे सुरक्षित

तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन कार्स एकमेकांवर धडकल्याने अपघातग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य सहकारी सुरक्षित असून एक सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करून आदित्य ठाकरे रत्नागिरी कडे रवाना झाले असल्याचे समजते. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. सिंधुदुर्ग रत्नागिरी प्रवासात खारेपाटण या गावाजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवार पासून आदित्य ठाकरे कोंकण दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्यात खारेपाटण जवळ ताफ्यातील तीन कार वेगाने जात असताना अचानक एका कारचालकाने ब्रेक लावल्याने या कार्स एकमेकांवर आदळल्या आणि अपघात झाला. बुधवारी आदित्य ठाकरे यांची मालवण येथे सभा आहे. मालवण हा माजी शिवसेना नेते आणि आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गड मानला जातो.

शिवसेना कोकणातील त्यांचा गड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. कोकण भागावर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस डोळे ठेऊन आहेत. त्यामुळे स्वतः आदित्य ठाकरे कोंकण दौऱ्यावर आले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते शिवसेना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड अश्या काही प्रमुख महापालिका निवडणुकांपूर्वी कोकणात स्वतःला मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. कोकण भागात वर्चस्व असलेले नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात गेले काही दिवस सतत ताणाताणी सुरु आहे. गेल्या ऑगस्ट मध्ये नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती.