कोविड लसीच्या चौथ्या डोस साठी अमेरिकेची मंजुरी

अमेरिकेत ५० वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविड लसीच्या चौथ्या डोस साठी मंजुरी दिली गेली आहे. आजारी व्यक्तींना काही अटींवर चौथा डोस घेता येणार आहे. अमेरिकेतील लस मान्यता देणारी संस्था एफडीए (फूड अँड ड्रग असो.)ने या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ५० वर्षावरील सर्व व्यक्ती आणि १२ वर्षांवरील आजारी व्यक्तींना चौथा डोस घेण्याची मंजुरी दिली असली तरी आजारी व्यक्तींसाठी काही अटी घातल्या आहेत.

१२ वर्षांवरील ज्या व्यक्ती आजारी आहेत आणि ज्यांनी फायझरचा तिसरा डोस घेतला आहे त्यांना त्यानंतर चार महिन्यांनी चौथा डोस घेता येणार आहे. मॉडर्नाचे तीन डोस घेतलेल्याना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच चौथा डोस घेता येणार आहे. त्यामुळे १२ ते १८ वयोगटातील लोकांना चौथ्या डोस साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगात अनेक देशात ओमिक्रोन बीए.२ च्या केसेस वाढत आहेत. अमेरिकेत गेल्या आठवड्यात २ लाख केसेस समोर आल्या असून गेल्या २४ तासात १६ हजार नवीन केसेस आढळल्या आहेत असे सांगितले जात आहे.