२१ वर्षात ११ चित्रपट, सगळे सुपरहिट, राजमौलीचा पराक्रम

एसएस राजमौली यांनी  त्यांच्या बाहुबली चित्रपटाने केवळ देशातच नव्हे तर जागतिक प्रसिद्धी मिळविली आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासात या तेलगु दिग्दर्शकाची नोंद सुवर्णाक्षरात करावी लागेल. सिनेमा जगताची कोणतीही चर्चा या दिग्दर्शकांच्या नावाशिवाय होऊ शकत नाही असे स्थान त्यांनी आज मिळविले आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला आरआरआरची सुरवातीची कमाई आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावते आहे. या चित्रपटाने पहिल्या दोन दिवसात ५८० कोटींचा व्यवसाय केल्याचे समोर आले आहे.

अर्थात राजमौली यांच्यासाठी इतिहास रचण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांच्या बाहूबलीने जागतिक प्रसिद्धी मिळवली आहेच पण आज राजमौली यांच्या नुसत्या नावावरच चित्रपट हिट होतो अशी कामगिरी त्यांनी बजावली आहे. गेली २१ वर्षे एसएस राजमौली चित्रपट सृष्टीत आहेत आणि या काळात त्यांनी अवघे ११ चित्रपट दिग्दर्शित केले आणि ते सर्व सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे त्यांना चित्रपटाचा जादुगार असे म्हटले जात आहे.

अर्थात राजमौली यांच्या रक्तातच चित्रपटाची बीजे आहेत. हा वारसा त्यांना घरातून मिळाला आहे. त्यांचे वडील विजयेंद्र प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आहेत. बाहुबलीचे दोन्ही भाग, बजरंगी भाई, मनकर्णिका,  थलाइवी अश्या अनेक गाजलेल्या चित्रपटाचे लेखन त्यांनी केले आहे. राजमौली यांनी सुरवातीला तेलगु टीव्ही सिरीयल साठी काम केले.२००१ मध्ये त्यांचा पहिला चित्रपट आला, ‘स्टुडंट नं.१’. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिके मिळाली आहेत. राजमौली फारच निवडक काम स्वीकारतात असा त्यांचा लौकिक आहे.