चीन मध्ये लागला सर्वात मोठा लॉकडाऊन
करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनच्या बी ए. २ ने पुन्हा आशिया आणि युरोप मधील काही देशात उत्पात माजविला असतानाच चीन मध्ये सर्वात मोठा लॉकडाऊन लावला गेला आहे. चीनची आर्थिक राजधानी असणाऱ्या शांघाई शहरात माणसेच काय पण पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर येण्यास मनाई केली गेली असल्याचे समजते. त्यामुळे सुमारे २.६ कोटी लोकसंख्येचे हे शहर पूर्ण बंद झाले आहे. यामुळे केवळ चीनच नाही तर या व्हेरीयंटच्या प्रसार असलेल्या अन्य देशात सुद्धा चिंतेचे वातावरण पसरले आहे.
चीनच्या काही भागात करोना केसेस मध्ये प्रचंड वेगाने वाढ होत आहे. शांघाईच्या पूर्व भागात त्यामुळे प्रतिबंध अधिक कडक केले गेले आहेत. कुणाही नागरिकांना घराबाहेर येण्यास परवानगी नाहीच पण घरासमोरील गल्ल्या, बोळातून पाळीव प्राण्यांना बाहेर सोडण्यास सुद्धा प्रतिबंध केला गेला आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय अश्यावेळी लागू केला आहे जेव्हा दैनिक संक्रमण मंगळवारी ४४७७ वर जाऊन पोहोचले आहे. फक्त कोविड चाचणी करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींना घराबाहेर पडता येणार आहे.
अन्य कोणत्याही कारणाने घराबाहेर पडल्यास कडक कारवाई केली जात असल्याचे समजते. शांघाई मध्ये या पूर्वी मर्यादित लॉकडाऊन होता पण आता तो सर्वात मोठा लॉकडाऊन झाला आहे. यापूर्वी वूहान मध्ये २०१९ च्या अखेरी पहिली करोना केस आढळल्यावर लावला गेलेला लॉकडाऊन ७६ दिवस सुरु राहिला होता.