काश्मीर खोऱ्यात परतू लागले काश्मिरी पंडित

कधीकाळी हिंसेचा गड राहिलेले दक्षिण काश्मीर नवीन युगाचा साक्षीदार बनू पाहते आहे. अनंतनाग जिल्ह्यातील मटन या छोट्या गावात किमान १५ ते १८ काश्मिरी पंडित नवीन घरे बांधू लागले असून काही घरांची दुरुस्ती सुरु असल्याचे दिसून येत आहे. काही घरे पूर्ण झाली आहेत. सध्या मोडकळीस आलेली घरे सोडून या पंडितांना १९९० मध्ये पलायन करावे लागले होते.

या संदर्भात १९९६ पासून येथेच राहत असलेले काश्मिरी पंडित अशोक कुमार सांगतात, येथील बहुतेक सर्व पंडित त्यावेळी घरे सोडून गेले होते. अशोक कुमार येथील प्रसिद्ध मार्तंड मंदिराचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले त्यावेळी हिंसा इतकी भडकली कि त्यात २०० घरे जाळली गेली आणि अनेकांना ठार केले गेले. पण यात सर्व मुस्लीम समाजाला दोषी धरता येणार नाही. कारण त्या काळात सुद्धा अनेकांनी हिंदुना मदत केली होती. आता परिस्थिती बदलते आहे. या गावातील १५ पंडित कुटुंबे परतली आहेत. काही वर्षात परिस्थिती शांत राहिली तर बाकीचेही परत येतील.

गेल्या काही वर्षात अनेक पंडित घाटी मध्ये परतले आहेत ज्यांनी परतण्याचा कधी विचारच केला नव्हता. येथील स्थानिक मुस्लीम आम्हाला घरे उभारण्यास मदत करत आहेत. काश्मिरी मुस्लीम समुदायच आमची घरे बांधत आहेत. फारूक अहमद लोन यावर बोलताना म्हणाले, पंडित परत येत आहेत यात आनंद आहे. आमचे त्यांना पूर्ण समर्थन आहे. तीन दशकांपूर्वी ते येथून गेले आता घरी परतत आहेत. अजून संख्या कमी आहे पण निदान सुरवात झाली याचे समाधान वाटते.