सौदीत या उंटाला लिलावात मिळाली १४ कोटीपेक्षा जास्त किंमत

उंटाची किंमत असून असून किती असेल असे कुणालाही वाटेल. पण सौदी मध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात एका उंटाला मिळालेली किंमत ऐकून तुम्ही तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. या लिलावात या उंटाला ७ दशलक्ष सौदी रियाल म्हणजे १४ कोटी २३ लाख रुपये किंमत मिळाली आहे. त्यामुळे हा जगातील सर्वात महाग उंट ठरला आहे. मुस्लीम समुदायाचा पवित्र महिना रमजान आता सुरु होत आहे. त्या अगोदर हा लिलाव झाला आहे.

गल्फ न्यूज मधील बातमी नुसार सार्वजनिक लिलावाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पारंपारिक वेशभूषेतील एक व्यक्ती लोखंडी कुंपणाच्या आत बांधलेल्या एका उंटासाठी बोली लावताना दिसत आहे. या उंटासाठी बोलीची सुरवातच ५ दशलक्ष रियाल म्हणजे १० कोटी १६ लाख रुपयांपासून सुरु झाली. या जातीचे उंट अतिशय दुर्लभ मानले जातात. या जातीचे उंट कमी आहेत. विशेष सौंदर्य आणि अनोखे मानले जाणारे हे उंट आहेत. या उंटाला अखेरची बोली १४ लाख २३ हजाराची लागली. हा उंट कुणी खरेदी केला त्याचे नाव जाहीर केले गेलेले नाही.

सौदी मधील नागरिकांच्या आयुष्याचा उंट हा अविभाज्य भाग आहे. ईदच्या दिवशी येथे उंटाचा बळी देण्याची प्रथा आहे. सौदी मध्ये दरवर्षी जगातील सर्वात मोठा उंट मेळा भरतो.