वाहतूक नियमभंग- दंडापोटी १८९९ कोटींचा महसूल

भारतीय जनतेने २०२१ मध्ये वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी भरलेल्या दंडातून १८९९ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत एका लेखी उत्तरात नमूद केले. त्यानुसार गतवर्षात  १.९८ कोटी वाहनचालकांना नियम उल्लंघन केल्याबद्दल चलने जारी केली गेली. यातील ३५ टक्के चलने जारी करून दिल्ली प्रथम क्रमांकावर आहे.

दिल्ली मध्ये गेल्या वर्षात ७१,८९,८२४ चलने केली गेली तर दोन नंबरवर तमिळनाडू असून तेथे ३६,२६,०३७ चलने आणि तीन नंबरवर केरळ मध्ये १७,४१,९३२ चलने जारी झाली. केंद्रीकृत डेटाबेस नुसार एकूण चलनातील २ लाखापेक्षा जास्त चलने अतिवेगाने वाहन चालविणे आणि रोड रेज साठी आहेत.

१ जानेवारी ते १५ मार्च २०२२ या काळात देशभरात वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणात ४१७ कोटी रुपये दंड गोळा केला गेला आहे. ४० लाख चलने पूर्वीच जारी झाली आहेत. या वर्षी हे आकडे आणखी वाढणार असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, वाहतूक नियम अंमलबजावणी कडक केली जात असल्याचा हा परिणाम आहे. नवीन मोटार वाहन नियम लागू झाल्यापासून नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.