रशिया – युक्रेन युद्ध, ब्रिटीश अर्थमंत्री सुनक अडचणीत

रशिया आणि युक्रेन मध्ये सुरु असलेल्या युद्धावरून ब्रिटिश अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यावर, त्यांच्या पत्नीवरून स्काय न्यूजवरील मुलाखतीत प्रश्नाचा भडीमार केला गेला. ब्रिटनने रशियावर अनेक निर्बंध घातले असून अनेक कंपन्यांनी रशियातील त्यांचा व्यापार बंद केला आहे. मात्र यावरून सुनक यांना टार्गेट केले गेले. गुरुवारी सुनक यांना तुमची पत्नी अक्षिता इन्फोसिस मध्ये भागीदार आहे आणि इन्फोसिसने रशियातील त्यांचे कार्यालय सुरु ठेवले आहे, तुम्ही रशियावर कडक निर्बंध घालण्याची बात करता पण स्वतःच्या घरात मात्र ते लागू करत नाही असा भडीमार केला गेला. ऋषी सुनक हे भारतीय सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. नारायण मूर्ती यांची कन्या अक्षिता इन्फोसिसची भागीदार आहे.

सुनक यांच्यावर तुमचे कुटुंब रशियाशी संबंधित आहे, रशियन अल्फा बँकेशी तुमच्या परिवाराचा संबंध आहे, पुतीन शासनात तुम्ही लाभार्थी आहात असे आरोप केले गेले. त्यावर सुनक यांनी,’ मी निवडून आलेला राजकीय नेता आहे. ज्या साठी मी जबाबदार आहे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची जबाबदारी माझ्यावर नक्कीच आहे पण माझ्या पत्नीची ती जबाबदारी नाही. रशियात ज्या ब्रिटीश कंपन्या व्यवसाय करत आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंध लावले आहेत. पण ज्या कंपन्या आमच्या अखत्यारीत नाहीत त्यांनी कुठे व्यवसाय करायचा याची जबाबदारी आमच्यावर नाही असे सुनावले आहे. सुनक पुढे म्हणाले, माझे त्या कंपनीशी काही देणेघेणे नाही त्याबद्दल मी बोलू शकत नाही.’