आयपीएलच्या नावाखाली बीसीसीआयची कमाई १६ हजार कोटी
आयपीएल २०२२ सुपर अॅक्शन आजपासून दोन महिने क्रिकेट वेड्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा उल्लेख इंडियन पैसा लीग असाही केला जातो कारण खरोखरच ही स्पर्धा बीसीसीआय, आयपीएल टीम मालक, खेळाडू यांच्यावर पैशाच्या पाउस पाडत असते. २००८ मध्ये या स्पर्धेची सुरवात झाली आणि यंदाचा हा १५ वा सिझन आहे. सुरवातीपासून या स्पर्धेची लोकप्रियता आणि कमाई वाढती राहिली आहे. या टी २० लीगचे आयोजन बीसीसीआय कडून केले जाते. पण खरे तर ही स्पर्धा म्हणजे भला मोठा व्यवसायच आहे. यातील प्रत्येक भागातून फक्त कमाईच होते असे दिसून येते.
या स्पर्धेतून एकूण जितका महसूल गोळा होतो त्यातील ६० ते ७० टक्के मिडिया राईट्स, टायटल स्पॉन्सरशिप मधून मिळतो. जाहिराती, प्रमोशनल रेव्हेन्यू २० ते ३० टक्के तर लोकल १० टक्के रेवेन्यु तिकीट विक्री अथवा अन्य वस्तूंच्या विक्रीतून मिळतो. प्रसारण हक्क मिळविण्यासाठी मिडिया कंपन्या प्रचंड पैसा देतात. २००८ ते २०१७ या काळात सोनीने बीसीसीआयला तब्बल ८२०० कोटी दिले आहेत तर २०१८ ते २२ या काळासाठी स्टार स्पोर्ट्सने १६३४७ कोटी दिले आहेत. आता २०२३ ते २०२८ साठीचे हक्क ३० हजार कोटी मध्ये जातील असे अंदाज व्यक्त केले जात आहेत.
या महसुलात बीसीसीआय आणि आयपीएल टीम चा हिस्सा ५०-५० टक्के असतो. टायटल स्पॉन्सरशिप मधून सुद्धा प्रचंड पैसा मिळविला जातो. डीएलएफ, पेप्सी, विवो नंतर यंदा टाटा टायटल स्पॉन्सर आहेत आणि त्यासाठी त्यांनी ३०० कोटी मोजले आहेत. जाहिरात प्रमोशन मधून होणारी कमाई वेगळीच आहे. जर्सी, टोप्या, हेल्मेट, विकेट, मैदानात कंपन्यांचे लोगो, लोगो छापलेल्या वस्तूंची विक्री यातून हा पैसा येतो. तिकीट विक्रीतून एका सामन्याचे किमान ४ ते ५ कोटी येतात त्यातील ८० टक्के स्थानिक टीमला दिले जातात.
आयपीएल टीमचा खर्च प्रायोजक करतात तरी त्यांना किमान १४० ते १५० कोटींचा लाभ मिळतो असे सांगितले जाते. आयपीएल ची ब्रांड व्हॅल्यु ४५ हजार कोटी असल्याचे मानले जाते.