सोन्याच्या श्रीलंकेची कंगाली, भारतावर शरणार्थीचे संकट

एके काळी सोन्याची श्रीलंका अशी प्रसिद्धी असलेला आपला शेजारी देश आता आर्थिक हालत अतिशय बिकट झाल्याने कंगालीच्या दिशेने वाटचाल करू लागला आहेच, पण त्यामुळे भारताला श्रीलंकेतून येणाऱ्या शरणार्थीच्या संकटास तोंड देण्याची पाळी आली असल्याचे दिसून येत आहे. श्रीलंकेवरचे हे आर्थिक संकट इतके बिकट अवस्थेला पोहोचले आहे की शाळेचे परीक्षा पेपर काढण्यास कागद सुद्धा उपलब्ध नाही आणि त्यामुळे परीक्षा घेणे अशक्य बनले आहे.

श्रीलंकेत रोजचे आवश्यक सामान मिळविण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लागत आहेतच पण महागाईने कळस गाठल्याने हे गरजेचे सामान मिळविणे नागरिकांना अशक्य बनले आहे. इंधनासाठी भल्या मोठ्या रांगा हे रोजचे दृश्य आहे. दुधाचे भाव २ हजार रुपये किलो, तांदूळ ५०० रूपये किलो असून वीज संकट ओढविल्याने दिवसातील ८-८ तास विना विजेचे काढण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. यामुळे भारतात येणाऱ्या शरणार्थीची संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी रात्री रामेश्वरम किनाऱ्यावर तटरक्षक दलाने सहा जणांना वाचविले, त्यात ३ बालके आहेत. अन्य १० शरणार्थी भारतीय किनाऱ्यावर आले आहेत. भारतात श्रीलंकेतून किमान २ हजारावर शरणार्थी येतील असे म्हटले जात आहे.

श्रीलंकेत सध्या सर्वात मोठा प्रश्न खाद्यान्नाचा आहे. साखर २९० रुपये किलोवर गेली आहे. या महागाई साठी अनेक कारणे आहेत त्यात मुख्य आहे विदेशी मुद्रा भांडार कमी होणे. तीन वर्षापूर्वी विदेशी मुद्रा भांडार ७.५ अब्ज डॉलर्स होते ते घटून १.५८ अब्ज डॉलर्सवर आले आहे. त्यामुळे चीन, जपान, भारत यांची कर्जफेड श्रीलंका करू शकत नाही. श्रीलंकेत पेट्रोलियम पदार्थ, औषधे प्रामुख्याने आयात केली जातात आणि विदेशी मुद्रा साठा कमी झाल्याने आयातीवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीन बिकट होत चालली आहे.