वीज खांबावरून मिळू शकेल ५ जी नेटवर्क

भारतात फाईव्ह जी नेटवर्क कधीही सुरु होऊ शकेल अशी परिस्थिती आली असताना टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायने विजेचे खांब, बसस्टॉप सारख्या पायाभूत सुविधांचा वापर हे नेटवर्क देण्यासाठी होऊ शकतो असा खुलासा केला आहे. या योजनेवर नागरिकांकडून ट्रायने सल्ले आणि सूचना मागविल्या आहेत. बुधवारी या संदर्भातली घोषणा ट्रायने केली असून या सूचना हरकती पाठविण्यासाठी २० एप्रिल पर्यंत मुदत दिली गेली आहे.

ट्रायच्या म्हणण्यानुसार वीज खांब, बस स्टॉप अश्या फर्निचरचा उपयोग करून घेतल्यास नवीन व मोठे मोबाईल टॉवर, फायबर ची गरज भासणार नाही. शिवाय फाईव्ह जी नेटवर्क इन्स्टॉलेशन खर्च कमी होणार आहे. शिवाय कमी कालावधीत हे नेटवर्क सुरु करता येणार आहे. देशाच्या ग्रामीण भागात व दुर्गम भागात सुद्धा सहजतेने फाईव्ह जी नेटवर्क पोहोचू शकणार आहे. स्ट्रीट फर्निचरचा वापर केल्याने देशात फाईव्ह जी छोटे सेल तैनात करण्यातील मोठी बाधा दूर होऊ शकणार आहे. हे तंत्र विकसित झाले तर फाईव्ह जी सेवा अतिजलद मिळेलच पण संबंधित नगरपालिका किंवा नगर परिषदांचे उत्पन्न वाढणार आहे असे सांगितले जात आहे.